रौप्य महोत्सवी वाटचाल
दोन संगणकांपासून सुरू झालेला माझा एमकेसीएलचा प्रवास
केंद्र नाव: जिया कॉम्प्युटर एज्युकेशन, सास्तूर (ALC Code: 36210133)
ई-मेल: 36210133@mkcl.org
लेखक: फारुख उमर केळगावे, सास्तूर, ता. लोहारा, जि. धाराशिव
भाग १ : मातीच्या घरातून तंत्रज्ञानाच्या विश्वातील पहिली झेप
प्रत्येक यशामागे एक संघर्ष दडलेला असतो. काही प्रवास मोठ्या शहरातून सुरू होतात, तर काही एका छोट्याशा खेड्यातील मातीच्या घरातून. माझा प्रवासही असाच एका साध्या, गरीब पण स्वप्नांनी भरलेल्या कुटुंबातून सुरू झाला.
माझे नाव फारुख उमर केळगावे. मी धाराशिव जिल्ह्यातील सास्तूर या १९९३ च्या भीषण भूकंपाने उद्ध्वस्त झालेल्या गावाचा रहिवासी. आजही हे गाव विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काहीसे दूर आहे. मात्र या गावाने मला संघर्ष, जिद्द आणि कष्टाची शिकवण दिली. याच गावातून माझा एमकेसीएलसोबतचा प्रवास सुरू झाला आणि आज जवळपास अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत.
सन २००७—त्या काळी संगणक म्हणजे गावातील लोकांसाठी एक आश्चर्यच होते. इंटरनेट म्हणजे काय, ई-मेल म्हणजे काय, ऑनलाइन परीक्षा म्हणजे काय, हे अनेकांना माहीत नव्हते. अशा काळात सास्तूरमध्ये सानिया कॉम्प्युटर सेंटर सुरू झाले. ते एमकेसीएलचे सॅटेलाईट सेंटर होते. त्या सेंटरचे चालक श्री. झहीर सवार होते.
मी त्या सेंटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. माझ्यावर त्यांनी पूर्ण विश्वास ठेवला आणि सेंटरची जवळपास सर्व जबाबदारी माझ्याकडे दिली. त्या काळात आमच्याकडे फक्त दोन Pentium-4 संगणक होते. 128 MB RAM, 80 GB हार्ड डिस्क, त्यावर Windows 98, MS Office 2000 आणि एमएस-सीआयटीचा डेमो. आजच्या मुलांना हे सांगितले तर त्यांना कदाचित विश्वासही बसणार नाही की एवढ्या मर्यादित साधनांमधून आम्ही डिजिटल शिक्षणाची सुरुवात केली होती.
मी स्वतः त्या वेळी विद्यार्थी होतो. संगणकाचे जेवढे ज्ञान मला होते, तेवढे मी विद्यार्थ्यांना शिकवत असे. Windows म्हणजे काय, फोल्डर कसा तयार करायचा, Word मध्ये टायपिंग कसे करायचे, Excel मध्ये गणिते कशी करायची, PowerPoint मध्ये स्लाईड कशी बनवायची—हे शिकवताना मलाही दररोज काहीतरी नवीन शिकायला मिळत होते. त्या काळात मला पगार मिळत नव्हता. माझ्या कामाचा मोबदला एवढाच होता की जुलै २००७ च्या बॅचचा माझा स्वतःचा एमएस-सीआयटीचा प्रवेश भरून देण्यात आला. माझ्यासाठी तोच त्या काळातील सर्वात मोठा सन्मान होता.
एमएस-सीआयटीची परीक्षा देण्यासाठी मी उमरगा येथील मायक्रो कॉम कॉम्प्युटर सेंटर येथे गेलो. आजही तो दिवस माझ्या डोळ्यांसमोर तसाच उभा राहतो. परीक्षा हॉलमध्ये माझ्या शेजारी बसलेले विद्यार्थी दुसरे कोणी नव्हते, तर माझ्याच हाताखाली शिकलेले ज्योती लोंढे आणि नितीन लोंढे हे दोघे भाऊ-बहीण होते. शिक्षक आणि विद्यार्थी एकाच दिवशी परीक्षा देत होते. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यभराचा अभिमान बनून राहिला.
काही महिन्यांनंतर सानिया कॉम्प्युटर सेंटर बंद झाले. त्या वेळी मी बी.ए.चे शिक्षण माकणी येथे घेत होतो. घरची आर्थिक परिस्थिती इतकी कठीण होती की कॉलेजची फी भरणेही अवघड व्हायचे. आमच्या घरी आम्ही सात जण होतो—आई, वडील, तीन भाऊ आणि दोन बहिणी. संपूर्ण कुटुंबाचा खर्च फक्त वडिलांच्या मजुरीवर चालायचा. घरातील मोठा मुलगा असल्याने जबाबदारी माझ्यावरही होती. अनेकदा स्वतःच्या स्वप्नांपेक्षा घर चालवणे महत्त्वाचे वाटायचे.
याच काळात रब्बानी नळेगावे यांनी झहीर सवार यांच्याकडील संगणक अवघ्या १० हजार रुपयांत विकत घेतले आणि नवीन सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांच्याकडे संगणक शिक्षक नव्हता. त्यांनी झहीर सवार यांच्याकडून माझ्याबद्दल माहिती घेतली आणि थेट आमच्या घरी आले. आजही तो दिवस मला स्पष्ट आठवतो. ते माझ्या आई-वडिलांसमोर बसले आणि म्हणाले, "मला तुमचा मुलगा माझ्या सेंटरवर शिक्षक म्हणून हवा आहे. मी त्याला महिन्याला ६०० रुपये पगार देईन."
आजच्या काळात ६०० रुपये ही फार छोटी रक्कम वाटेल. पण २००७ मध्ये आमच्यासारख्या गरीब कुटुंबासाठी ती मोठी आशा होती. माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आजही माझ्या डोळ्यांसमोर आहे. त्यांना वाटत होते की त्यांचा मुलगा आता "कॉम्प्युटर शिक्षक" म्हणून गावात ओळखला जाईल. त्या काळी संगणक शिक्षकाला गावात विशेष आदर मिळत असे. माझ्यासाठी ती केवळ नोकरी नव्हती; ती माझ्या आयुष्याला मिळालेली पहिली खरी ओळख होती.
याच क्षणापासून माझा आणि एमकेसीएलचा प्रवास अधिक दृढ झाला. मला तेव्हा कल्पनाही नव्हती की या छोट्याशा सुरुवातीतून पुढे मी स्वतःचे ALC उभे करेन, हजारो विद्यार्थ्यांपर्यंत संगणक शिक्षण पोहोचवेन आणि एक दिवस एमकेसीएलच्या २५ वर्षांच्या इतिहासात माझ्या प्रवासाची नोंद करण्याची संधी मिळेल.
भाग २ : गायत्री कॉम्प्युटर सेंटर, इंटरनेटची सुरुवात आणि आठवणींचा सुवर्णकाळ
रब्बानी नळेगावे यांनी सेंटर सुरू केल्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढू लागला. प्रवेश शुल्कातून त्यांनी आणखी चार संगणक विकत घेतले. त्या काळी संगणकावर सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणे हीसुद्धा एक मोठी प्रक्रिया होती. उमरगा येथील डबरे सर बूट, सूट घालून गाडीवरून सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनसाठी यायचे. Windows XP, MS Office आणि इतर आवश्यक सॉफ्टवेअर सीडीमधून इन्स्टॉल करून द्यायचे. प्रत्येक संगणकामागे साधारण ३०० रुपये आणि प्रवास खर्च घ्यायचे. त्या काळी हीच आमच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची सुरुवात होती.
विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती आणि माझी जबाबदारीही वाढत होती. त्याच वेळी रब्बानी यांनी माझ्या आई-वडिलांसमोर एक आश्वासन दिले होते. ते म्हणाले होते, "जर या वर्षी ५० एमएस-सीआयटी प्रवेश झाले, तर मी फारुखला २,००० रुपये रोख आणि नवीन नोकिया मोबाईल बक्षीस देईन." हे ऐकून माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्यांच्या दृष्टीने ते फक्त बक्षीस नव्हते; त्यांच्या मुलाच्या मेहनतीची मिळणारी पहिली मोठी दाद होती.
मात्र नियतीने वेगळेच काही ठरवले होते. त्या वर्षी ५० नव्हे तर तब्बल ८० एमएस-सीआयटी प्रवेश झाले. याचे साक्षीदार श्री शांतेश्वर विद्यालयाचे भालके सर आहेत. मला या संख्येचा आनंद होता; पण मी ही बातमी घरी कधी सांगितली नाही. काही विद्यार्थ्यांनी ती माझ्या आई-वडिलांपर्यंत पोहोचवली. त्यानंतर जवळजवळ रोज आई-वडील मला विचारायचे, "काय रे, मोबाईल मिळाला का? रब्बानींनी दोन हजार रुपये दिले का?" त्यांच्या प्रत्येक प्रश्नामध्ये प्रेम होते, अपेक्षा होती आणि मुलाच्या यशाचा आनंद होता. पण मी मात्र शांत राहायचो.
कारण माझ्या मनात त्या बक्षिसाचा कधीच लोभ नव्हता. लोकांच्या नजरेत मी शिक्षक होतो; पण स्वतःच्या नजरेत मी कायम विद्यार्थीच होतो. प्रत्येक नवीन गोष्ट शिकण्याची भूकच माझी खरी संपत्ती होती. नवीन टास्क, नवीन सॉफ्टवेअर, नवीन फीचर्स, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि chimneys (त्यांची उत्तरे) शोधणे—यामध्येच मला खरी मजा वाटायची.
२००८ ची बॅच होती. दहावी झालेला एक मुलगा, ज्याचे नाव आकाश पांचाळ होते, त्याने एमएस-सीआयटीमध्ये चक्क १०० पैकी १०० गुण मिळवले. मग तर जणू असा आनंद झाला जसा की मी हिमालय पर्वतच चढलो! गावात चौकामध्ये मोठे फ्लेक्स लावले गेले. ते माझ्या मेहनतीचे फळ होते, असा आनंद मनोमनीच होता.
परगावचे विद्यार्थी यायचे, काही जण दिवसभर काम करून यायचे. मी पण रात्री १० वाजता सेंटरमध्येच झोपत असे. आजही माझे विद्यार्थी असलेले संतोष गोपीनाथ सरवदे आठवणीने सांगतात, "सर, तुम्ही झोपलेले असायचा; आम्ही तुम्हाला डेमोमधला प्रश्न विचारला असता, तुम्ही लगेच उत्तर देत होता." हे ऐकताना आजही मन भरून येते.
सकाळी सहा ते रात्री १० पर्यंत बॅच असायची, कारण स्लो सिस्टम होती. लाईट गेली की स्वतः जनरेटर उचलून बाहेर आणायचा—२८०० पॉवरचा, आणि बेल्ट ओढायचा, जो रॉकेल आणि पेट्रोलचा गुटका देऊन सुरू व्हायचा. त्या काळात विद्यार्थ्यांमध्ये एक मजेशीर वाक्य प्रसिद्ध झाले होते—"डेमो डगरीला लावणे!" एमएस-सीआयटीच्या डेमोतील प्रत्येक प्रश्न आम्ही इतक्या वेळा सोडवायचो की तो विद्यार्थ्यांच्या तोंडपाठ व्हायचा. शिक्षण हे ओझे नव्हते; ती आमच्यासाठी एक आनंदाची प्रक्रिया होती.
शेवटी ८० प्रवेश होऊनही ना मोबाईल मिळाला, ना २,००० रुपयांचे बक्षीस. माझे आई-वडील, काही विद्यार्थी आणि गावातील लोक यामुळे नाराज झाले. त्यांना वाटले, मेहनतीचा योग्य सन्मान व्हायला हवा होता. पण माझ्या मनात मात्र कोणतीही कटुता निर्माण झाली नाही. कारण मी त्या बक्षिसासाठी कामच करत नव्हतो. माझे ध्येय फक्त एकच होते—शिकणे आणि विद्यार्थ्यांना शिकवणे.
याच काळात आमच्या गायत्री कॉम्प्युटर सेंटरची ओळख परिसरात वेगाने वाढू लागली. दहावीचा निकाल लागण्याचा दिवस म्हणजे आमच्यासाठी जणू एखादा सणच असायचा. आजूबाजूच्या पंधरा गावांमध्ये इंटरनेट असलेले ते एकमेव सेंटर होते. निकाल पाहण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत विद्यार्थ्यांची, पालकांची आणि नागरिकांची रांग लागलेली असायची. सेंटरमध्ये अक्षरशः श्वास घेण्याइतकीही जागा उरत नसे.
त्या काळी Dial-up Internet होते. फोन लाईन जोडून इंटरनेट सुरू करावे लागायचे. इंटरनेट कनेक्ट होताना येणारा तो खास आवाज आजही कानात घुमतो. एखादे पान उघडायला अनेक मिनिटे लागायची, पण संयम मात्र अमाप होता. निकाल पाहून प्रिंट काढण्यासाठी लोक आनंदाने १५ ते २० रुपये द्यायचे. निकाल हातात मिळाल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारा आनंद आणि पालकांच्या डोळ्यात दिसणारे समाधान हीच आमच्या मेहनतीची खरी कमाई होती.
ऑगस्ट २००९ मध्ये जेव्हा Broadband Internet आले, तेव्हा आम्हाला जणू नवीन युग सुरू झाल्याचा अनुभव आला. आजच्या फायबर इंटरनेटच्या काळात ही गोष्ट साधी वाटेल; पण त्या वेळी ते आमच्यासाठी क्रांतीपेक्षा कमी नव्हते. २००९ ते २०११ या काळात मी मुरूम येथील माधवराव पाटील महाविद्यालयात एम.ए.चे शिक्षण घेत होतो. शिक्षण, सेंटर आणि घरची जबाबदारी यांचा समतोल साधत आयुष्य पुढे जात होते.
याच काळात, सन २००९ मध्ये श्री शांतेश्वर विद्यालयाचे भालके सर यांच्या साक्षीने रब्बानी यांनी माझ्या कामाचे कौतुक करत मला आश्वासन दिले होते की, "पुढील महिन्यापासून तुझा पगार ८०० रुपयांवरून १,००० रुपये करतो." त्या शब्दांवर मी विश्वास ठेवला. मात्र एक महिना गेला, दोन महिने गेले आणि पाहता पाहता सहा-सात महिने उलटून गेले, तरीही पगारवाढ प्रत्यक्षात झाली नाही. त्या क्षणी थोडे वाईट नक्कीच वाटले; पण माझ्या मनात राग किंवा नाराजी नव्हती. कारण माझ्यासाठी पैशांपेक्षा अनुभव, ज्ञान आणि विद्यार्थ्यांचे यश अधिक मौल्यवान होते. त्या दिवसांनी मला एक महत्त्वाचा धडा दिला—दिलेला शब्द पाळणे हीच माणसाची खरी ओळख असते; आणि अपेक्षेपेक्षा कर्तव्याला प्राधान्य दिले तर प्रवास अधिक समृद्ध होतो. मी गायत्री कॉम्प्युटर सेंटर सोडण्याचा निर्णय घेतला.
नोव्हेंबर २०११ मध्ये मी पुण्यातील नाना पेठ येथे एका डेअरीमध्ये मोठ्या हॉटेल्सना दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरविण्याचे काम करण्यासाठी गेलो. अवघा एक महिना तेथे काम केले. पण मन मात्र सतत गावात, विद्यार्थ्यांमध्ये आणि संगणक शिक्षणातच रमलेले होते. महिना संपताच मी पुन्हा सास्तूरला परतलो. आणि कदाचित नियतीने माझ्यासाठी वेगळेच काही लिहून ठेवले होते.
गावी आल्यानंतर माझी भेट शिवराज गळाकाटे सर आणि लोहार सर यांच्याशी झाली. त्यांनी मला सांगितले, "फारुख, एमकेसीएलच्या नवीन ALC नोंदणी सुरू आहेत. तू स्वतःचे सेंटर सुरू कर." त्यांच्या त्या एका वाक्याने माझ्या आयुष्याला पुन्हा एक नवीन दिशा मिळाली. विद्यार्थी म्हणून सुरू झालेला माझा प्रवास आता स्वतःच्या ALC स्थापनेच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला होता.
भाग ३ : जिया कॉम्प्युटर एज्युकेशनचा उदय आणि यशाची शिखरे
२०१२ हे वर्ष माझ्या आयुष्याला सुवर्णबदल देणारे ठरले. मनात प्रचंड इच्छाशक्ती आणि हाताशी शून्य भांडवल अशा स्थितीत मी स्वतःचे अधिकृत एमकेसीएल केंद्र स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू केली. केंद्राचे नाव मी ठेवले—'जिया कॉम्प्युटर एज्युकेशन' (ALC Code: 36210133). हे केवळ एक सेंटर नव्हते, तर माझ्या कष्टाचे, माझ्या कुटुंबाच्या आशेचे आणि सास्तूर परिसरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचे ते एक मंदिर होते.
सुरुवातीला आर्थिक अडचण एवढी मोठी होती की अधिकृत केंद्रासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा आणि संगणक उभे करणे म्हणजे डोंगराएवढे आव्हान होते. पण म्हणतात ना, जेव्हा तुमचे हेतू प्रामाणिक असतात, तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला मदत करते. मी बँकांचे उंबरठे झिजवले, मित्रांकडे शब्द टाकला आणि एमकेसीएलने दिलेल्या पारदर्शक व सुलभ नोंदणी पद्धतीमुळे जिया कॉम्प्युटर एज्युकेशन दिमाखात सुरू झाले.
केंद्र सुरू झाल्यावर माझ्या खांद्यावरील जबाबदारी कैक पटींनी वाढली. पूर्वी मी केवळ शिक्षक होतो, आता मी एक संचालक, मार्गदर्शक आणि व्यवस्थापक होतो. पहिल्याच वर्षापासून सास्तूर आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातील मुला-मुलींनी जिया कॉम्प्युटर एज्युकेशनवर अथांग विश्वास दाखवला. ज्या मातीच्या घरातून आणि गरिबीतून मी आलो होतो, त्याच ग्रामीण भागातील एकही मुलगा संगणक साक्षरतेपासून वंचित राहू नये, यासाठी मी अहोरात्र काम सुरू केले.
भाग ४ : माझ्या ALC चे आदर्श माजी विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक
गेल्या चौदा वर्षांच्या प्रवासात जिया कॉम्प्युटर एज्युकेशनने केवळ हजारो विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे दिली नाहीत, तर त्यांच्या आयुष्याला एक ठोस दिशा दिली. माझ्या सेंटरमधून शिकून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज समाजाच्या विविध स्तरांत गौरवास्पद कामगिरी करत आहेत.
आकाश पांचाळ: २००८ मध्ये ज्या विद्यार्थ्याने एमएस-सीआयटी परीक्षेत १०० पैकी १०० गुण मिळवून संपूर्ण सास्तूर परिसरात इतिहास रचला, तो आज आमच्या केंद्राची सर्वात मोठी ओळख आहे. त्याच्या त्या यशामुळे गावातील पालकांचा संगणक शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला.
नितीन लोंढे आणि ज्योती लोंढे: माझ्यासोबतच एकाच हॉलमध्ये बसून परीक्षा देणारे हे दोघे भाऊ-बहीण आज स्वावलंबनाचे उत्तम जीवन जगत आहेत. जेव्हा ते भेटतात, तेव्हा "आमचे सर आणि आम्ही एकत्र परीक्षा दिली होती" ही आठवण सांगताना त्यांच्या डोळ्यांतील आदर माझ्या संघर्षाचे चीज करतो.
संतोष गोपीनाथ सरवदे: रात्रीच्या वेळीही डेमोमधील तांत्रिक अडचणी विचारणारा आणि शिक्षणावर निस्सीम प्रेम करणारा हा विद्यार्थी आज स्वतःच्या पायावर उभा आहे.
या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या यशामागे माझ्या केंद्रावरील आदर्श शिक्षक व शिक्षिकांचे मोलाचे योगदान आहे. ग्रामीण भागातील मुलींना संगणक शिकवताना महिला शिक्षिकांनी निर्माण केलेले सुरक्षित आणि आपुलकीचे वातावरण मैलाचा दगड ठरले. आमच्या शिक्षकांनी केवळ 'इरा' (ERA) वर क्लिक करायला शिकवले नाही, तर त्या क्लिकच्या माध्यमातून जगाशी कसे जोडले जायचे, याचे संस्कार दिले.
भाग ५ : MKCL कडून मिळालेले श्रेयस्कर संस्कार आणि कौटुंबिक परिवर्तन
एमकेसीएल (MKCL) ही माझ्यासाठी केवळ एक व्यावसायिक संस्था नाही, तर तो माझ्या जगण्याचा एक संस्कार आहे. एमकेसीएलच्या 'इरा' (Learning Rocket ERA) या कार्यप्रणालीने माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रचंड शिस्त आणली.
१. कौटुंबिक जीवन आणि समाजात मिळालेली प्रतिष्ठा
ज्या कुटुंबाचा खर्च कधीकाळी वडिलांच्या रोजच्या मजुरीवर चालत होता, त्या कुटुंबाला एमकेसीएलने आर्थिक स्थैर्य दिले. दोन खोल्यांच्या घरातून सुरू झालेला हा प्रवास आज जिया कॉम्प्युटर एज्युकेशनच्या एका सुसज्ज केंद्रापर्यंत पोहोचला आहे. आज समाजात मला "केळगावे सर" म्हणून जे आदराचे स्थान मिळाले आहे, ते केवळ आणि केवळ एमकेसीएलमुळेच. माझ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आज जो स्वाभिमान दिसतो, तो माझ्या जीवनातील सर्वात मोठा पुरस्कार आहे.
२. पुढील पिढीवर झालेले संस्कार
एमकेसीएलच्या या तांत्रिक आणि शैक्षणिक वातावरणामुळे माझ्या कुटुंबातील पुढील पिढीही घडत आहे. माझा मुलगा सैफुल्लाह हा सध्या पाचवीत शिकत आहे. डिजिटल युगाचे संस्कार त्याच्यावर नकळत होत आहेत. त्याला वयाच्या या टप्प्यावरच कॉम्प्युटर, तंत्रज्ञान आणि डिजिटल साक्षरतेचे महत्त्व समजले आहे, जे मला वयाच्या २० व्या वर्षी समजले होते. हा जो पिढ्यानपिढ्यांमधील गॅप एमकेसीएलने भरून काढला आहे, तो अत्यंत श्रेयस्कर आहे.
भाग ६ : MKCL वरील परखड टीका आणि दुरुस्त्या (एक सजग भागीदार म्हणून)
एमकेसीएलने मला जन्माची ओळख दिली, म्हणूनच एका जागृत आणि प्रामाणिक कुटुंबातील सदस्याप्रमाणे एमकेसीएलवर परखड टीका करणे आणि काही सुधारणा सुचवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. आज २५ वर्षांची रौप्य महोत्सवी वाटचाल साजरी करत असताना, एमकेसीएलने आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.
१. अभ्यासक्रम आणि काळाची गरज
आज तंत्रज्ञान कमालीच्या वेगाने बदलत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), चॅटजीपीटी (ChatGPT) आणि विविध एआय टूल्स (AI Tools) आजच्या जगात क्रांती करत आहेत. अशा वेळी आपला पारंपारिक एमएस-सीआयटी (MS-CIT) चा अभ्यासक्रम काहीसा जुना वाटू लागतो. विंडोज आणि ऑफिसच्या बेसिक गोष्टींच्या पुढे जाऊन विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ओळख प्राथमिक स्तरावरच करून देणे गरजेचे आहे.
२. ग्रामीण भागातील ALCs च्या समस्या आणि शुल्क धोरण
ग्रामीण भागातील सेंटर्सची आर्थिक गणिते शहरांसारखी नसतात. खेड्यापाड्यात सतत जाणारी वीज, इंटरनेटच्या पायाभूत सुविधांचा अभाव आणि शेतीवर अवलंबून असलेली आर्थिक परिस्थिती यामुळे प्रवेश फी भरणे विद्यार्थ्यांना जड जाते. एमकेसीएलने ग्रामीण (Rural) आणि शहरी (Urban) सेंटर्ससाठी वेगवेगळे लवचिक फी धोरण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच, स्पर्धा वाढल्यामुळे ग्रामीण भागातील सेंटर्सना टिकवून ठेवण्यासाठी एमकेसीएलकडून मिळणारे कमिशन आणि थेट सहकार्य वाढले पाहिजे.
३. विपणन (Marketing) आणि ब्रँडिंगमधील अनास्था
पूर्वी एमकेसीएल आणि एमएस-सीआयटीचे जे ब्रँडिंग टीव्ही, वर्तमानपत्रे आणि मोठ्या पोस्टर्सच्या माध्यमातून व्हायचे, ते आता कमी झाले आहे. संपूर्ण मार्केटिंगची जबाबदारी स्थानिक ALC वर सोडून चालणार नाही. राज्य स्तरावर एमकेसीएलने पुन्हा एकदा आक्रमक ब्रँडिंग मोहीम राबवणे गरजेचे आहे, जेणेकरून खाजगी क्लासच्या स्पर्धेत एमकेसीएलचा दर्जा उठून दिसेल.
भाग ७ : नव्या व्यवसायांचे पर्याय, नव्या दिशा आणि नवोन्मेष
पुढील २५ वर्षांचा विचार करताना एमकेसीएलने केवळ संगणक साक्षरतेपुरते मर्यादित न राहता नवोन्मेष (Innovation) आणि नव्या व्यवसायांचे पर्याय उपलब्ध करून दिले पाहिजेत.
अत्याधुनिक कौशल्यांचे कोर्सेस: एमकेसीएलने ग्रामीण भागातील युवकांसाठी डेटा अनॅलिसिस (Data Analysis), कंटेंट मॉडरेशन (Content Moderation), आणि इमेज अॅनोटेशन (Image Annotation) यांसारखे कोर्सेस सुरू करावेत, ज्यांना जागतिक स्तरावर रिमोट वर्क (Remote Work) मध्ये प्रचंड मागणी आहे.
शासकीय आणि डिजिटल सेवांची जोडणी: प्रत्येक ALC ला शासकीय योजनांचे केंद्र (उदा. GeM - Government e-Marketplace पोर्टल सेवा, ई-गव्हर्नन्स सेवा) बनवण्यासाठी एमकेसीएलने अधिकृत करार करावेत. यामुळे सेंटर्सना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील आणि गावातील लोकांना एकाच छताखाली सर्व तांत्रिक सेवा मिळतील.
भाग ८ : ALC समन्वयक या भूमिकेतील माझे नवे संकल्प
एमकेसीएलच्या या रौप्य महोत्सवी वर्षात, जिया कॉम्प्युटर एज्युकेशनचा समन्वयक म्हणून मी स्वतःशी आणि माझ्या सास्तूर परिसराशी काही नवे संकल्प करत आहे:
१. एआय साक्षरता अभियान: मी स्वतःला एक एआय ट्रेनर (AI Trainer) म्हणून विकसित करत असून, सास्तूर आणि लोहारा तालुक्यातील किमान ५०० ग्रामीण तरुणांना मोफत एआय टूल्सच्या वापराचे प्राथमिक प्रशिक्षण देणार आहे, जेणेकरून ते जागतिक प्रवाहात मागे पडणार नाहीत.
२. महिला सक्षमीकरण: ग्रामीण भागातील मुली आणि महिलांना डिजिटल बँकिंग, ऑनलाइन शासकीय सेवा आणि घरबसल्या काम करण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष बॅचेसचे आयोजन करणार आहे.
३. रोजगारभिमुख शिक्षण: माझ्या केंद्रात येणारा प्रत्येक विद्यार्थी केवळ प्रमाणपत्र घेऊन जाणार नाही, तर तो स्वतःचा उद्योग सुरू करेल किंवा रिमोट वर्कच्या माध्यमातून कमावण्यास सक्षम होईल, यासाठी मी 'कौशल्य विकास कक्ष' स्थापन करणार आहे.
निष्कर्ष : कृतज्ञता आणि पुढील झेप
मागे वळून पाहताना जाणवते की, दोन संगणकांपासून सुरू झालेला हा प्रवास केवळ माझा नव्हता; तो माझ्यासारख्या हजारो ग्रामीण ALC संचालकांचा होता. आम्ही फक्त संगणक शिकवले नाहीत, तर एका पिढीला डिजिटल जगाशी जोडले. एमकेसीएलने आम्हाला व्यवसाय दिला, ओळख दिली, आत्मविश्वास दिला आणि आयुष्यभर जपण्यासारख्या असंख्य आठवणी दिल्या.
भूकंपाच्या छायेतून सावरलेल्या सास्तूरच्या मातीतून सुरू झालेला हा वेल आज एमकेसीएलच्या रौप्य महोत्सवी वटवृक्षाची एक मजबूत फांदी बनला आहे. आजही आणि भविष्यातही मी अत्यंत अभिमानाने सांगत राहीन—
"मी एमकेसीएल परिवाराचा एक छोटासा पण अत्यंत समर्पित आणि सजग सदस्य आहे!"
जय हिंद, जय महाराष्ट्र!
Comments
Post a Comment