२० वर्षांपूर्वीची शाळा आणि आजची शाळा : बदललेली शिक्षणसंस्कृती
सुमारे वीस वर्षांपूर्वीची शाळा आणि आजची शाळा यामध्ये प्रचंड फरक निर्माण झाला आहे. हा फरक केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित नाही, तर शिक्षणाची संकल्पना, शिक्षकांची भूमिका, संस्कृती, शिस्त आणि शिक्षणाचा मूळ उद्देशच बदललेला दिसतो.
पूर्वीच्या काळात शिक्षणासाठी फारसा पैसा लागत नसे. अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना मोफत शिकवत, मार्गदर्शन करत. त्या काळात शिक्षकांचा पगार आजच्या तुलनेत खूपच कमी होता, काही वेळा वेळेवर पगारसुद्धा मिळत नसे. तरीसुद्धा शिक्षकांचे जीवन समाधानकारक, साधे आणि सुरळीत चाललेले असे. शिक्षण ही सेवा मानली जात होती, व्यवसाय नव्हे.
त्या काळात Android मोबाईल, इंटरनेट किंवा डिजिटल साधने नव्हती, पण शिक्षक विद्यार्थ्यांसाठी वेळ देत. अभ्यासासोबत संस्कार, शिस्त, नीतीमूल्ये यावर भर दिला जात असे. शिक्षक गावातच, शाळेजवळ राहत, त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात आपुलकी होती. शिक्षकांचा दरारा इतका होता की पालकसुद्धा शिक्षकांसमोर तंबाखू, सुपारी खाण्याची हिंमत करत नसत. शिक्षक म्हणजे आदर, शिस्त आणि विश्वास यांचे प्रतीक होते.
आजची शाळा मात्र पूर्णपणे वेगळ्या दिशेने चाललेली दिसते. आज LKG, UKG पासूनच इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली पश्चिमी (Western) संस्कृती भारतात आणली गेली आहे. इंग्रजी शिकवणे वाईट नाही, पण त्याबरोबर आपली संस्कृती, भाषा आणि मूल्ये बाजूला पडत चालली आहेत. लहान वयातच मुलांवर अनावश्यक ताण टाकला जात आहे.
आज शिक्षणसंस्था म्हणजे व्यवसाय बनला आहे. फीच्या नावाखाली लूट सुरू आहे. डोनेशन, ट्युशन फी, अॅक्टिव्हिटी फी, युनिफॉर्म, पुस्तकं—सगळं महाग झालं आहे. शिक्षण संस्था वाढल्या, पण शिक्षणाची गुणवत्ता आणि संस्कार कमी झाले.
आज अनेक शिक्षक शहरात लाखो रुपयांचे बंगले बांधून, लाखो रुपयांच्या गाड्यांतून गावातील शाळेत येतात. शिक्षक आणि गाव यांच्यातील नातं तुटलेलं आहे. शिवाय आज ९० टक्क्यांहून अधिक शिक्षक सुपारी, गुटखा, तंबाखूचे सेवन करताना दिसतात. जे विद्यार्थी आदर्श म्हणून पाहतात, तेच शिक्षक वाईट सवयी करताना दिसल्यावर शिस्त आणि नैतिकतेचा प्रभाव कमी होतो.
या सगळ्यात गरिब माणूस दोन्ही बाजूंनी वंचित राहतो. सरकारी शाळांमध्ये गुणवत्ता कमी होत चालली आहे, आणि खासगी शाळांची फी तो भरू शकत नाही. त्यामुळे गरिबांची मुलं शिक्षणापासून, संस्कारांपासून आणि संधींपासून दूर जात आहेत.
यावरून स्पष्ट होते की, शिक्षणाची खरी ताकद इमारतींमध्ये, इंग्रजीत किंवा मोबाईलमध्ये नाही, तर समर्पित शिक्षक, नीतीमूल्ये आणि सेवाभावात आहे. आपण जर हे वेळेत समजून घेतले नाही, तर शिक्षण व्यवस्था उरेल, पण समाज घडवणारे शिक्षण नष्ट होईल.
– फ़ारुख उमर केळगावे
जिया कॉम्प्युटर एज्युकेशन, सास्तूर
Comments
Post a Comment