आजची शाळा शिक्षण देत आहे की फक्त विक्री करत आहे?
वीस वर्षांपूर्वीची शाळा आणि आजची शाळा यांची तुलना केली तर एकच प्रश्न मनात उभा राहतो — आपण शिक्षण पुढे नेले की शिक्षणाचा बाजार उभा केला?
पूर्वी शिक्षणासाठी फारसा पैसा लागत नव्हता. अनेक शिक्षक विद्यार्थ्यांना मोफत शिकवत, वेळ देत, मार्गदर्शन करत. पगार कमी होता, कधी नव्हताच, तरी शिक्षकांचे जीवन साधं, समाधानकारक आणि सुरळीत चाललेलं होतं. कारण शिक्षण ही सेवा होती, धंदा नव्हता. आज मात्र प्रश्न पडतो — फी भरल्याशिवाय शिक्षण मिळतच नाही का?
त्या काळात Android, मोबाईल, इंटरनेट नव्हतं. तरी शिक्षक वर्गात तासन्तास थांबत. आज सर्व सुविधा असूनही शिक्षकांचा वेळ विद्यार्थ्यांसाठी कमी का आहे? मोबाईलमध्ये गुंतलेले शिक्षक समाज घडवू शकतात का?
पूर्वी शिक्षक गावातच राहत. त्यामुळे शाळा, शिक्षक आणि समाज यांच्यात नातं होतं. शिक्षकांचा दरारा इतका होता की पालकसुद्धा शिक्षकांसमोर तंबाखू, सुपारी खाण्याची हिंमत करत नव्हते. आज परिस्थिती उलटी आहे. आज शिक्षकांना कोणीच का घाबरत नाही? दरारा गेला की शिस्त कशी राहील?
आज LKG, UKG पासून इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली पश्चिमी संस्कृती भारतात लादली जात आहे. प्रश्न असा आहे — इंग्रजी शिकवायची की संस्कृती विसरवायची? लहान मुलांवर एवढा ताण देणं खरंच आवश्यक आहे का? आपली भाषा, आपली मूल्यं कुठे हरवली?
आज शिक्षणसंस्था उभ्या राहिल्या, पण त्या सेवेसाठी आहेत की फक्त पैशासाठी? फी, डोनेशन, अॅक्टिव्हिटी, युनिफॉर्म, पुस्तकं — ही लूट नाही तर काय आहे? शिक्षणाचा हक्क सांगणाऱ्या देशात गरिब मुलांसाठी शिक्षण इतकं महाग कसं झालं?
आज अनेक शिक्षक शहरात कोट्यवधींचे बंगले बांधून, लाखोंच्या गाड्यांतून गावातील शाळेत येतात. ही प्रगती आहे का दुरावा? शिवाय ९० टक्क्यांहून अधिक शिक्षक सुपारी, गुटखा, तंबाखू खाताना दिसतात. जे विद्यार्थी आदर्श मानतात, तेच शिक्षक व्यसन करताना पाहिल्यावर समाजाकडून काय अपेक्षा ठेवायच्या?
या सगळ्यात गरिब माणूस दोन्ही बाजूंनी चिरडला जातो. सरकारी शाळा दुर्लक्षित, खासगी शाळा परवडत नाहीत. मग गरिबाच्या मुलांनी शिकायचं कुठे? ही व्यवस्था त्यांच्यासाठी नाही का?
आज प्रश्न केवळ शिक्षणाचा नाही, तर भविष्यातील समाजाचा आहे. शिक्षण जर आजच विकलं जात असेल, तर उद्याचा नागरिक कसा असेल? अजूनही वेळ आहे. शिक्षणाला बाजारातून बाहेर काढून पुन्हा सेवेत आणण्याची गरज आहे. नाहीतर आपण इमारती उभ्या करू, पण माणसं घडवू शकणार नाही.
– फ़ारुख उमर केळगावे
जिया कॉम्प्युटर एज्युकेशन, सास्तूर
Comments
Post a Comment